नाशिक : दिंडोरीरोडवरील वैदूवाडीत कपडे खरेदीसाठी दिलेल्या पैशांचा जाब विचारल्याने थोरल्या मुलाने वडिलांसह दोघा भावांना बेदम मारहाण केली. या घटनेत तिघे बापलेक जखमी झाले आहे. याप्रकरणी वडिल राजेंद्र धनगर यांनी तक्रार दाखल केली असून म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निलेश राजेंद्र धनगर (२२ रा.वैदूवाडी) असे बापलेकांना मारहाण करणा-या संशयिताचे नाव आहे. धनगर कुटुंबिय शनिवारी रात्री आपल्या घरात असतांना थोरला मुलगा असलेला संशयित मद्याच्या नशेत घरी आला. यावेळी त्यास कपडे घेण्यासाठी पाच हजार रूपये दिले त्याचे काय केले असा कुटुंबियांनी जाब विचारला असता संशयिताने शिवीगाळ करीत पैसे तुमच्या बापाचे आहेत काय ? असा प्रश्न उपस्थित करीत वडिलांसह योगेश आणि राकेश या बापलेकांना लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. यावेळी वाद मिटविण्यासाठी आलेल्या सूनेलाही संशयिताने शिवीगाळ केल्याचे तक्रारीत म्हटले असून या घटनेत तिघे बापलेक जखमी झाले आहेत. अधिक तपास पोलिस नाईक फुगे करीत आहेत.