नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अल्पवयीन तीन मुली घरात काही एक न सांगता निघून गेल्याच्या शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी घटना घडल्या आहे. संबधीत मुलींना कुणी तरी पळवून नेल्याचा संशय कुटुंबियांचा आहे. याप्रकरणी पंचवटी आणि सातपूर पोलिस ठाण्यात अपहरणाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिली घटना औद्योगीक वसाहतीतील पाईपलाईन रोड भागात घडली. गणेशनगर येथील अल्पवयीन मुलगी सोमवार पासून बेपत्ता आहे. तिचे कुणी तरी अपहरण केल्याचा अंदाज कुटुंबियांनी वर्तविला आहे. तर महादेववाडीतील अल्पवयीन मुलगी गेल्या गुरूवार (दि.१३) पासून बेपत्ता आहे. तिला अभिषेक रमेश साळवे (रा.आंबेगाव ता.दिंडोरी) या संशयिताने पळवून नेल्याचा संशय कुटूंबियाने वर्तविला असून, दोन्ही घटनांप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात अपहरणाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर तिसरी घटना हिरावाडीतील त्रिमुर्तीनगर भागात घडली. येथे राहणारी अल्पवयीन मुलगी सोमवारपासून बेपत्ता आहे. घरात कुणासही काही एक न सांगता ती निघून गेली असून तिला कुणी तरी पळवून नेल्याचा अंदाज कुटूंबियांनी वर्तविला आहे. याप्रकरणी पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून पंचवटी पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.