नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -औद्योगीक वसाहतीतील वृंदावननगर भागात किराणा बाजार करून घराकडे परतणा-या महिलेच्या गळयातील मंगळसूत्र दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेल्याची घटना घडली. प्रतिभा हेमंत मेणे (रा.ऐश्वर्या संकुल,विखे पाटील शाळेजवळ वृंदावननगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेणे या मंगळवारी (दि.१८) दिवाळीचा बाजार करण्यासाठी परिसरातील किराणा दुकानात गेल्या होत्या. खरेदी करून त्या घराकडे पायी जात असतांना ही घटना घडली. गणेश हाईटस या इमारतीसमोरून त्या पायी जात असतांना पाठीमागून दुचाकीवर आलेल्या भामट्यांनी त्यांच्या गळय़ातील सुमारे ३० हजार रूपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावून नेले. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक गणेश शिंदे करीत आहेत.