नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक जुने नाशिक भागात विद्यूत पुरवठा खंडीत केल्याच्या रागातून वायरमनला मारहाण करणा-या दोघांविरुध्द भद्रकाली पोलिस ठाण्यात शासकिय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मारहणा प्रकरणी सचिन एकनाथ लिटे (४४) या वीज कर्मचा-याने तक्रार दाखल केली आहे. अजय पवार व लखन पवार (रा.दोघे घ.न.३८९२ सार्व.सुलभ शौचालयाजवळ,दरबाररोड) अशी वीज कर्मचा-यास मारहाण करणा-या संशयितांची नावे आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर वीज वितरण कंपनीकडून थकित ग्राहकांकडील वसूलीसाठी वीज पुरवठा खंडीत करण्याची मोहिम हाती घेण्यात आली आहे. लिटे मंगळवारी (दि.१८) दुपारच्या सुमारास आपल्या सहका-यांसमवेत जुने नाशिक परिसरातील दरबाररोड भागात थकित बीलांची वसूली करीत असतांना ही घटना घडली. संशयितांच्या घरी जावून कर्मचा-यांनी थकित लाईट बिल भरले का अशी विचारणा केली होती. यावेळी अजय पवार यांनी नकार दिल्याने लिटे यांनी त्यांचा विज पुरवठा खंडीत केला. मिटर मधील वायर कट करून लिटे आपल्या सहका-यांच्या दिशेने पायी जात असतांना संतप्त अजय पवार याने मागून दगड फेकून मारला. तर लखन पवार याने लोखंडी सळईने बेदम मारहाण केली. याप्रसंगी अन्य कर्मचारी लिटे यांच्या मदतीला धावले असता संशयितांनी अन्य कर्मचाºयांशी हुज्जत घालत शिवीगाळ केली. या घटनेत लिटे जखमी झाले असून अधिक तपास उपनिरीक्षक भालेराव करीत आहेत.