नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुख्यालयात अर्जित आणि वैद्यकीय रजा टाकून आंतरजिल्हा बदल्यांसाठी बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणारे १६ पोलिस नॉट रिचेबल झाले आहे. या पोलिसांचा ग्रामिण पोलिस राज्यभरात शोध घेत आहेत. २१ सशयित अंमलदारापैकी केवळ पाच पोलिसांचा जबाब आतापर्यंत नोंदविण्यात आला आहे. याबाबत न्यायालयाने विचारणा केल्याने कायदा व सुव्यवस्था विभागाने त्याची गंभीर दखल घेतली असून संबधितावर अटकेची टांगती तलवार आहे.
ग्रामीण पोलिस दलात आंतरजिल्हा बदल्यांसाठी एकवीस पोलिसांनी नातेवाइकांच्या गंभीर आजारांसह शस्त्रक्रियेचे अहवाल सादर केले. हे बनावट असल्याचे पोलिस अधीक्षकांच्या निदर्शनास आल्यावर जिल्हा रूग्णालय प्रशासनाला विचारणा झाली. त्यावेळी या अहवालांचे पितळ उघडे पडले. संबंधित अंमलदारांवरही थेट गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप एकही पोलिस अटकेत नाही. २१ पैकी पाच जण स्वत:हून नाशिक तालुका पोलिसांत हजर झाले. त्यांच्या अहवालात फार दोष नसल्याचे समजते. उर्वरित सोळा जण मात्र रजेवर असून, त्यांना वेळोवेळी नोटिसा बजावूनही ते हजर झालेले नाहीत. तालुका पोलिसांचे पथक मुख्यालयासह संबंधित अंमलदारांच्या घरी धडकले असून, तेथील रिपोर्ट तयार करण्यात आला आहे. हे अंमलदार घरात नसून, नातेवाइकांनाही त्यांची कल्पना नाही. त्यांच्या मूळ गावीही पथकांनी तपास केला आहे. हे अंमलदार कुठेही न सापडल्याने ते गायब असल्याचा अहवाल तयार होत आहे. परिणामी, या पोलिसांसमोरील अडचणीत वाढ झाली असून, त्यांची रजा संपल्यानंतर कर्तव्यावर हजर झाल्यावर अटकेची शक्यता आहे.