नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा ) जिल्हा व सत्र न्यायालयाने चार वर्षीय बालकाचा लैंगिक छळ करून अनैसर्गिक कृत्य करण्याचा प्रयत्न करणा-या आरोपीस तीन वर्ष सश्रम कारावास आणि पाच हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. मनोज उर्फ साई शिवदास श्रीवंत (४५ रा.सुभाषरोड पवारवाडी,ना.रोड) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. हा खटला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश डी. डी. देशमुख यांच्या कोर्टात चालला. ११ नोव्हेंबर २०१८ रोजी पवारवाडी भागात ही घटना घडली होती.
आरोपी श्रीवंत याने ११ नोव्हेंबर रोजी सकाळच्या सुमारास परिसरातील लहानग्या चार वर्षीय मुलास आपल्या घरात बोलावून घेत हे कृत्य केले होते. घरात आलेल्या मुलास सोप्यावर झोपवून त्याने लैंगिंक छळ केला. तसेच अनैसर्गिक कृत्य करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र मुलाने आरडाओरड केल्याने हा प्रकार पोलिसात पोहचला होता. पालकांच्या तक्रारीवरून नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक एस.व्ही.शेंडकर यांनी करून पुराव्यानिशी दोषारोप पत्र न्यायालयात सादर केले. विषेश सरकारी वकिल अॅड. दिपशिखा भिडे यांनी जोरदार युक्तीवाद करीत नऊ साक्षीदार तपासले. न्यायालयाने फिर्यादी, साक्षीदार आणि पंच यांनी दिलेली साक्ष व तपासी अधिका-यांनी सादर केलेले परिस्थितीजन्य पुराव्यास अनुसरून आरोपीस तीन वर्ष सश्रम कारावास आणि पाच हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली.