नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– सिडकोसह इंदिरनगर भागातून चोरीला गेलेल्या तब्बल ३ लाख ९० हजार रूपये किमतीच्या नऊ मोटारसायकली अंबड पोलिसांनी हस्तगत करुन दोन जणांना गजाआड केले आहे. या कारवाईत अजून गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सचिन अनिल हिरे (२६) व प्रमोद दिलीप बच्छाव (३५ रा. दोघे मोरवाडी,सिडको) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. उत्तमनगर येथील ओमकार राधाकृष्ण पेंढारकर (रा.शिवपुरी चौक) याची एमएच १५ जीई ५४९२ ही दुचाकी गेल्या १७ ऑगष्ट रोजी चोरीस गेली होती. सकाळच्या सुमारास घरासमोर पार्क केलेली दुचाकी चोरट्यांनी पळवून नेल्याने याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सिडकोसह औद्योगीक वसाहतीत दुचाकी चोरीच्या घटना वाढल्याने पोलिस चोरट्यांच्या मागावर असतांनाच पोलिस शिपाई योगेश शिरसाठ व येवले यांना मिळेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. संशयितांकडे चोरीच्या मोटारसायकली असल्याची माहिती मिळताच वरिष्ठ निरीक्षक भगीरथ देशमुख, निरीक्षक नंदन बगाडे आणि श्रीकांत निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा लावून दोघांना जेरबंद केले असता चोरीच्या मोटारसायकली पोलिसांच्या हाती लागल्या. या दुकलीच्या अटकेने अंबड चार, इंदिरानगर दोन व मालेगाव पोलिस ठाण्यात दाखल असलेले तीन गुन्हे उघडकीस आले असून संशयितांच्या ताब्यातून विविध कंपनीच्या नऊ मोटारसायकली पोलिसांनी हस्तगत केल्या.