नाशिक : विनयभंग करणा-या सिडकोतील ५६ वर्षीय आरोपीस न्यायालयाने ३ वर्ष सश्रम कारावास आणि एक हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. हा खटला अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. एस.एस.खरात यांच्या कोर्टात चालला. गेल्या वर्षी उत्तमनगर भागात दहा वर्षीय मुलीस घरात बोलावून हे कृत्य आरोपीने केले होते. रविंद्र आबाजी जगताप (रा.एकता चौक,उत्तमनगर) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
२७ ऑक्टोबर २०२१ रोजी दहा वर्षीय पीडित मुलगी आपल्या घरासमोर खेळत असतांना ही घटना घडली होती. मुलीचे पालक घरी नसल्याची संधी साधत त्याने मुलीस आपल्या घरी बोलावून घेत विनयभंग केला होता. ही बाब मुलीने कामावरून घरी परतलेल्या पालकांना सांगितल्याने अबंड पोलिस ठाण्यात विनयभंगासह लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम १० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्हयाचा तपास उपनिरीक्षक एच.एस.पावरा यांनी करून पुराव्यानिशी दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले होते. सरकारी अभियोक्ता श्रीमती एस.एस.गोरे यांनी जोरदार युक्तीवाद करीत साक्षीदार तपासले असता न्यायालयाने फिर्यादी, साक्षीदार आणि पंच यांनी दिलेली साक्ष व तपासी अधिका-यांनी सादर केलेले परिस्थितीजन्य पुराव्यास अनुसरून आरोपीस तीन वर्ष सश्रम कारावास आणि एक हजार रूपये दंड तसेच दंड न भरल्यास एक महिना सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.