नाशिक : औरंगाबादनाका भागात मद्यपानाचे पैसे मागितल्याने टोळक्याने दारू दुकानदारासह कामगारांना बेदम मारहाण केली. या घटनेत टोळक्याने कोयत्याचा वापर केल्याने बार मालकासह व्यवस्थापक आणि एक कामगार जखमी झाले आहे. याप्रकरणी मितेश मनीलाल राठोड (रा.अमृतधाम) यांनी तक्रार दाखल केली असून आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश नरोडे, विकी नरोडे, रवी गांगुर्डे, अक्षय बेजेकर, दीपक बेजेकर आणि त्यांचे तीन साथीदार अशी संशयित टोळक्यातील सदस्यांची नावे आहेत. राठोड यांचे औरंगाबाद नाका येथे सारंग बार नावाचे दारू दुकान आहे. रविवारी (दि.१६) रात्री राठोड आपला व्यवसाय सांभाळत असतांना संशयित टोळके मद्यपानासाठी बिअर बार मध्ये आले होते. मद्यपानानंतर बार मालकाने बिल मागितले असता ही घटना घडली. टोळक्याने कसले पैसे असे म्हणून हॉटेल मालक राठोड यांच्यासह कामगारांना शिवीगाळ केली. यावेळी राठोड यांनी समजून सांगण्याचा प्रयत्न केला असता संतप्त संशयित टोळक्याने राठोड यांच्यासह व्यवस्थापक अजय सुरेश पाटील (रा.सावरकर चौक) व कामगार राजेंद्र विठोबा काकवीपुरे (रा.जत्रा हॉटेल मागे) यांनाही लाथाबुक्यांनी मारहाण केली. या घटनेत टोळक्यातील एकाने तिघांवर कोयत्याने हल्ला केल्याने ते जखमी झाले असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक संतोष शिंदे करीत आहेत.