नाशिक : देवळाली गावातील मालधक्का रोड भागात दुकानाबाहेर बोलावून घेत टोळक्याने मालकासह एकास बेदम मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी सागर सुधाकर पगारे (२१ रा.रमाबाई आंबेडकरनगर,मालधक्कारोड) या युवकाने तक्रार दाखल केली असून नाशिकरोड पोलिस ठाण्यात चार जणांच्या टोळक्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संतोष उर्फ भैरव दोंदे,विशाल माने,लालचंद शिरसाठ व किरण गाडे (रा.सर्व मालधक्कारोड,देवळाली गाव) अशी मारहाण करणा-या संशयितांची नावे आहेत. पगारे रविवारी (दि.१६) सायंकाळच्या सुमारास प्रशांत रोकडे यांच्यासमवेत त्यांच्या प्रिया सर्व्हीसेस या दुकानात असतांना ही घटना घडली. दुकान मालकाशी गप्पा मारत असतांना संशयित संतोष दोंदे व विशाल माने हे तेथे आले. रोकडे यांना दुकानाबाहेर बोलावून घेत संशयितांनी जुन्या भांडणाच्या वादातून शिवीगाळ करीत रोकडे यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. यावेळी पगारे हे वाद मिटविण्याचा प्रयत्न करीत असतांना संशयितांनी त्यांनाही बेदम मारहाण केली. या घटनेत पगारे यांच्या कपाळावर वजनी वस्तू मारण्यात आल्याने ते जखमी झाले असून अधिक तपास जमादार ढगे करीत आहेत.