नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – चुंचाळे शिवारात उघड्यावर सुरू असलेला जुगार अड्डा पोलिसांनी उदध्वस्त करुन सहा जुगारींना बेड्या ठोकल्या. या कारवाईत पोलिसांनी जुगाराच्या साहित्यासह रोकड असा सुमारे अडीच हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिपक वाबळे,बाबू सकट,विकी कापसे,निवृत्ती कांबळे,रोहिदास गायकवाड व सुरेश चिले (रा.सर्व घरकुल योजना,चुंचाळे) अशी अटक करण्यात आलेल्या संशयित जुगारींची नावे आहेत. घरकुल योजनेच्या पाणी टाकी भागात गेल्या काही दिवसांपासून राजरोसपणे काही युवक उघड्यावर पत्यांवर जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने सापळा लावून छापा टाकला असता संशयित पोलिसांच्या जाळयात अडकले. पत्यांच्या कॅटवर ते पैसे लावून अंदर बाहर जुगार खेळत होते. संशयितांच्या ताब्यातून रोकड व जुगाराचे साहित्य असा सुमारे २ हजार ५८० रूपये हस्तगत करण्यात आले असून याप्रकरणी पोलिस शिपाई राकेश राऊत यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार देसले करीत आहेत.