विवाह सोहळयासाठी पिकअप वाहनातून प्रवास करीत असतांना साडेचार लाख रूपये लंपास
नाशिक : सिडकोतील पवननगर भागात विवाह सोहळयासाठी पिकअप वाहनातून प्रवास करीत असतांना चोरट्यांनी एकाच्या हॅण्डबॅगेतील दागिणे व रोकड असा सुमारे साडेचार लाख रूपये लंपास केले. निवृत्ती लक्ष्मण लोखंडे (रा.रमाबाई आंबेडकरनगर,घाटकोपर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली असून अंबड पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोखंडे गेल्या शुक्रवारी शहरात आले होते. पवननगर येथून ते नातेवाईकांसमवेत निफाड तालुक्यातील जिव्हाळे येथे विवाहसोहळय़ासाठी जात असतांना ही घटना घडली. एमएच १५ जीव्ही ६४३६ या पिकअप वाहनातून प्रवास करीत असतांना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या हॅण्डबॅगेतील रोकड व दागिणे अश्या सुमारे ४ लाख ५८ हजाराच्या ऐवजावर डल्ला मारला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक राजपूत करीत आहेत.
२० वर्षीय तरूणाचा मृत्यू
नाशिक : दहा दिवस जिल्हा रूग्णालयात मृत्यूशी झुंज देणा-या २० वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला. अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतल्याने तो ६१ टक्के भाजला होता. उपचार सुरु असतांना त्याचा मृत्यु झाला. अजय मोहन धोत्रे (२० रा.हिरावाडी पुलाजवळ,पंचवटी) असे मृत युवकाचे नाव आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अजय धोत्रे याने गेल्या २४ जून रोजी रात्री अज्ञात कारणातून हिरावाडी पुलाजवळील सार्वजनिक शौचालय परिसरात स्व:ताच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले होते. या घटनेत तो ६१ टक्के भाजला होता. भाऊ विकास धोत्रे याने त्यास तात्काळ गंभीर अवस्थेत जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असतांना रविवारी त्याचा मृत्यू झाला. अधिक तपास पोलिस नाईक खाजेकर करीत आहेत.