नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पोलिस असल्याची बतावणी करीत वृध्दांचे अलंकार पळविणा-या इराणीला पोलिसांनी मालेगाव येथून ताब्यात घेऊन गजाआड केले आहे. या भामट्याकडून पोलिसांनी सव्वा दोन लाख रूपये किमतीचे ५० ग्रॅम सोने हस्तगत केले. या चोराने साथीदारांच्या मदतीने तीन गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने केली. सादीकअली राहतअली सैय्यद (५८ रा.दरेगाव शिवार मालेगाव) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. जेलरोड भागात १७ ऑगष्ट रोजी घडलेल्या गुन्ह्यात सैय्यद याला अटक करण्यात आली आहे. लोखंडे मळा परिसरातील हनुमंतानगर येथील दत्तमंदिरासमोर रस्त्याने पायी जाणा-या वृध्दास गाठून संशयिताने पोलिस असल्याची बतावणी करीत अलंकार लांबविले होते. या गुन्ह्यातील आरोपी मालेगाव येथे वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली युनिटचे पथक मालेगाव येथे रवाना झाले होते. बुधवारी पथकाने संशयितास हुडकून काढत बेड्या ठोकल्या असून त्याने आपल्या इराणी साथीदारांच्या मदतीने नाशिक शहरात तीन गुह्याची कबुली दिली आहे. संशयिताच्या अटकेने उपनगर पोलिस ठाणे हद्दीतील दोन आणि इंदिरानगर पोलिस ठाणे हद्दीतील एक गुन्हा उघडकीस आला आहे. ही कारवाई उपनिरीक्षक विष्णू उगले अमंलदार रविंद्र बागुल,प्रविण वाघमारे,प्रदिप म्हसदे,नाझिम पठाण,आसिफ तांबोळी,प्रशांत मरकड व महेश साळूंके आदींच्या पथकाने केली.