नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आरटीओ आणि पोलिस या दोन्ही विभागांनी केलेल्या संयुक्त धडक कारवाईत बेकायदा प्रवासी वाहतूक करणारी एक बस जप्त केली आहे. त्याचप्रमाणे वेगवेगळया ठिकाणी पथकांनी नाकाबंदी करीत ११७ प्रवासी वाहतूक करणा-या खासगी बसची तपासणी करीत ३१ चालकांकडून ७७ हजाराचा दंड वसूल केला आहे. औरंगाबाद रोडवरील ट्रव्हल बस जळीत कांडानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. त्यात या दोन्ही विभागाच्या रडारवर ट्रव्हल्स व्यवसाय आला आहे. ही कारवाई दिंडोरी जकात नाका, पेठ रस्त्यावरील जकातनाका, शिलापूर टोलनाका, शिंदे पळसे टोलनाका, मुंबई-आग्रा महामार्गावर नववा मैल, गौळाणे फाटा आदी सहा ठिकाणी पोलीस व आरटीओच्या पथकांनी केली. अवैध प्रवासी वाहतूक करणा-या खासगी बसची तपासणी करुन ११७ खासगी बसची तपासणी केली. त्यातील ३१ बसमध्ये नियमांचे उल्लंघन झाल्याचे निष्पन्न झाले. या बसवर कारवाई करीत ७६ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून एक खासगी बस प्रादेशिक परिवहन कार्यालयात जमा करण्यात आली आहे.