नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पळसे गाव येथे जुन्या भांडणाची कुरापत काढून कोयता व लाकडी दांड्याने हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या नवविवाहित युवकाचा उपचार दरम्यान मृत्यू झाला. या मारहाणीत दोघे गंभीर जखमी झाले होते. त्यापैकी अक्षय गायकवाड हा जास्त गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर त्यांना नाशिकरोड व नंतर नाशिक येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दोघांवर उपचार सुरू असताना त्यातील अक्षय गायकवाड याचा मृत्यू झाला. अक्षय गायकवाड याचा दोन महिन्यापूर्वी विवाह झाला होता. या प्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेत चार जणांच्या सराईत टोळक्याने हा हल्ला केला होता. मयूर फकिरा जाधव (वय २३, रा. चेहडी पंपिंग) व त्याचा मित्र अक्षय संजय गायकवाड हे दोघे चेहडीकडून सामनगाव पॉलिटेक्निक कॉलेजकडे ५ ऑक्टोबर रोजी रात्री जात होते. म्हस्के मळ्या जवळ आले असता समोरून एक सफेद अल्टो वाहनात त्याचे मित्र उमेश गायधनी, ऋषी तुंगार, निखिल गायखे, गोपी पवार (सर्व रा. पळसे) असे चौघे आले व त्यांनी मागील भांडणाची कुरापत काढून शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांच्याकडे असलेल्या लोखंडी कोयता व लाकडी दांडे व इतर हत्याराने मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत दोघे गंभीर जखमी झाले होते. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शेळके करीत आहेत. चारही हल्लेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.