नाशिक : बेरोजगारांना लाखों रूपयांना गंडा घालणा-या दोघा बहिणींवर अखेर फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा शासकिय रूग्णालयातील अधिका-यांशी ओळख असल्याचे भासवून ही फसवणूक करण्यात आल्याचे समोर आले आहे. या फसवणूक प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फरिन जुल्फेकार शेख व जकिया जुल्फेकार शेख (रा.अजमेरी मशिदीजवळ,नाईकवाडीपुरा) असे संशयित फसवणूक करणा-या बहिणींचे नावे आहेत. याप्रकरणी अरबाज सलिम खान (२४ रा.जीपीओ रोड,रसुलबाग कब्रस्तान खडकाळी) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. काही महिन्यांपूर्वी सदर युवकाने पोलिसात धाव घेतल्यानंतर हा प्रकार चर्चेत आला होता. दोन्ही बहिणींनी सदर युवकास गाठून जिल्हा शासकिय रूग्णालयात कायमस्वरूपी नोकरीस लावून देण्याचे आमिष दाखविले होते. या मोबदल्यात २५ एप्रिल २०२२ रोजी युवकाकडून १ लाख २८ हजार रूपयांची रोकड घेण्यात आली होती. ही रक्कम मुजीब मुश्ताक खान यांच्या दुकानात स्विकारण्यात आली होती. काही महिने उलटूनही काम होत नसल्याने खान यांनी संशियीतांकडे पैश्याचा तगादा लावला असता त्यांनी टाळटाळ केल्याने हा प्रकार पोलिसात पोहचला होता. चौकशीत संशयितांकडून अनेकांना गंडविल्याचे पुढे येताच खान यांनी भद्रकाली पोलिस ठाण्यात तक्रारी अर्ज दाखल केला होता. मात्र पोलिसांनी दोन्ही बाजू समजून घेत अखेर दोन्ही बहिणींविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक बिडकर करीत आहेत.