दोन घरफोड्याच्या घटना; एक लाखाचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास
नाशिक : शहरात वेगवेगळया ठिकाणी झालेल्या दोन घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी सुमारे एक लाखाचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी भद्रकाली आणि अंबड पोलिस ठाण्यात घरफोडीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे सिडकोत भरदिवसा घरफोडी करण्यात आली आहे. जुने नाशिक परिसरातील अंबुबाई सटवाजी वास्टर (रा.कोळीवाडा,भगवतीनगर) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, वास्टर कुटुंबिय रविवारी बाहेरगावी गेले असता ही घरफोडी झाली. अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून वरच्या मजल्यावरील बेडरूममधील कपाटातून सुमारे ६० हजार ५०० रूपये किमतीचे अलंकार चोरून नेले. त्यात सोन्याचे गंठण,बाळ््या,मुरणी व चांदीचे पट्टे आणि करदोडे आदींचा समावेश आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक गवळी करीत आहेत. दुसरी घटना सिडको भागात घडली. शिवाजी छबुराव दातीर (रा.सिंहस्थनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. दातीर कुटूंबिय गेल्या ३० सप्टेंबर रोजी दुपारी दवाखान्यात गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी बंद घराचा कडीकोयंडा तोडून कपाटातील सुमारे ४६ हजार ६०० रूपये किमतीचे सोन्याचांदीचे अलंकार चोरून नेले. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार शेख करीत आहेत.
………..
४० वर्षीय महिलेने केली आत्महत्या
नाशिक : ४० वर्षीय महिलेने आपल्या राहत्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना बोरगड परिसरातील स्नेहनगर भागात घडली आहे. सोनाली अनिल भामरे (४० रा.पंचरत्न अपा.स्नेहनगर) असे मृत महिलेचे नाव आहे. भामरे यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. भामरे यांनी सोमवारी (दि.१०) आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये अज्ञात कारणातून पंख्याच्या कडीस ओढणी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला. ही घटना दुपारच्या सुमारास उघडकीस आली. याबाबत राजेश संतोष भामरे यांनी दिलेल्या खबरीवरून मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार रानडे करीत आहेत.
……..