नाशिक : मखमलाबाद नाका भागात एकमेकांचा हात पकडून रस्ता ओलांडत असतांना भरधाव दुचाकीने धडक दिल्याने अनुक्रमे आठ व दहा वर्षांचे दोघे भावंडे जखमी झाले. या घटनेत दोन्ही भावांच्या पायाचे हाड मोडले असून डोक्यास गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात अज्ञात दुचाकीस्वाराविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृष्णा जहांगीर (१०) व साहिल जहांगीर (०८ रा.दोघे पिझा दुकानाजवळ,क्रांतीनगर) अशी जखमी भावंडाची नावे आहेत. याप्रकरणी वडिल प्रकाशकुमार मोहनलाल जहांगीर यांनी तक्रार दाखल केली आहे. कृष्णा व साहिल हे दोघे भावंडे गेल्या गुरूवारी (दि.६) आपल्या घराजवळील रस्ता ओलांडत असतांना हा अपघात झाला. दोघे भाऊ एकमेकांचा हात पकडून रस्ता ओलांडत असतांना मखमलाबाद नाक्याकडून ड्रिमकॅसेलच्या दिशेने भरधाव जाणाºया दुचाकीने त्यांना ठोर मारली होती. अपघातानंतर दुचाकीस्वार पसार झाला असून कृष्णाचा गुडघ्यात तर लहानग्या साहिलचा डाव्या पायाचे हाड मोडले आहे. गंभीर जखमी झालेल्या दोघा भावंडावर उपचार सुरू आहेत. अधिक तपास पोलिस नाईक कोरडे करीत आहेत.