नाशिक : औद्योगीक वसाहतीतील शिवाजीनगर भागात जुन्या वादातून चार जणांच्या टोळक्याने तरूणास बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेत लाकडी दांडक्यासह फरशीचा तुकडा फेकून मारल्याने युवक जखमी झाला असून याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय जगताप व त्याचे तीन अनोळखी साथीदार अशी संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी अपबाज महमद शेख (२२ रा.गणपती मंदिरासमोर,शिवाजीनगर) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. शेख बुधवारी (दि.५) रात्री आहिल्याबाई होळकर चौकात गेला असता ही घटना घडली. संशयित टोळक्याने गाठून मागील भांडणाची कुरापत काढून त्यास शिवीगाळ करीत लाथाबुक्यांनी मारहाण केली. या घटनेत एकाने लाकडी दांडक्याने तर जगताप याने फरशीचा तुकडा मारून फेकल्याने शेख जखमी झाला असून अधिक तपास पोलिस नाईक सरनाईक करीत आहेत.