नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – त्र्यंबकरोडवरील वेद मंदिर भागात बँकेच्या एटीएम बुथमधील सर्व्हरच्या सुमारे ८० हजार रूपये किमतीच्या दहा बॅट-या चोरट्यांनी लंपास केल्या. जोया रशिद खान (रा.सिंगाडा तलाव) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली असून मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खान या पंजाब नॅशनल बँकेच्या एटीएम बुथची देखभाल दुरूस्तीची कामे सांभाळतात. पंजाब नॅशनल बँकेच्या वेद मंदिर शाखा भागातील एटीएम बुथमध्ये ही चोरी झाली. अज्ञात चोरट्यांनी मंगळवारी एटीएम बुथमधील सर्व्हर रूममध्ये शिरून ही चोरी केली. या ठिकाणी लावलेल्या सुमारे ८० हजार रूपये किमतीच्या दहा बॅट-या चोरट्यांनी चोरून नेल्या. ही बाब दुस-या दिवशी उघडकीस आली. अधिक तपास हवालदार सोनार करीत आहेत.