नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – चेहडी पंपीग भागात दुचाकी धुण्याचे पैसे मागितल्याने संतप्त टोळक्याने सर्व्हीस स्टेशन चालविणा-याला लोखंडी रॉड व लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. या घटनेत एक जण गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदू पगारे, अमोल पगारे, सुरज पगारे व विशाल वाघ अशी मारहाण करणा-या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी सुरज दिनकर घोडे (रा.सामनगाव रोड,चेहडी बु.) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. घोडे यांचा चेहडी पंपीग येथील भगवा चौकात शिव सर्व्हीस स्टेशन नावाचा व्यवसाय आहे. बुधवारी (दि.५) दस-या निमित्त घोडे यांच्या सर्व्हीस स्टेशनवर वाहने धुण्यासाठी गर्दी होती. याच वेळी संशयित नंदू पगारे हा आपली युनिकॉर्न दुचाकी धुण्यासाठी आला होता. सदरची दुचाकी वॉशिंग झाल्यानंतर त्याच्याकडे पैसे मागितले असता ही घटना घडली. तक्रारदार सुरज घोडे हे नंदू पगारे याच्याकडे पैश्यांची मागणी करीत असतांना संशयितांने धमकावित शिवीगाळ केली. यावेळी त्याच्यासोबत असलेल्या अमोल पगारे याने चुलत भाऊ वैभव घोडे याच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून जखमी केले तर उर्वरीत संशयितांनी चुलते हरिश घोडे आणि तक्रारदार घोडे यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. अधिक तपास उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.