नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अंबड पोलिसांनी पाच सराईत घरफोड्यांना अटक करुन त्यांच्याकडून ४५ तोळे सोने व रोकड असा सुमारे २८ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या पाच सराईत घरफोड्या करणा-या चोरट्यांनी अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन घरफोड्या केल्या होत्या. त्याची उकल आता पोलिसांनी केली आहे.
अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील १६ ऑगस्ट रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी आनंद गोविंद रायककलाल (रा. वाईड आर्चड, तिडके कॉलनी, अंबड) यांच्या बंद घराचे लॉक तोडून घरफोडी केली होती. या घरफोडीत घरातून ३२ तोळे सोने चोरून नेले होते. याप्रकरणी अंबड पोलिस तपास करीत असताना पोलीस नाईक उमाकांत टिळेकर यांना गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार गुन्हेशोध पथकाने संशयित घरफोडे अक्षय उत्तम जाधव (२६, रा. दत्तनगर, अंबड), संदीप सुधाकर आल्हाट (२४), बाबासाहेब गौतम पाईकराव (२८), विकास प्रकाश कंकाळ (२१, सर्व रा. कांबळेवाडी, भीमनगर, सातपूर) यांना शिताफीने अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी १६ लाख रुपयाचे ३२ तोळे सोने व सोने विक्री करून त्या मोबदल्यात प्राप्त ६ लाख ५० हजार रुपये जप्त केले. तर दुस-या घटनेत महालक्ष्मीनगर येथे मुलीच्या अज्ञानपणाचा गैरफायदा घेत संशयित आकाश संजय शिलावट (रा. नाशिकरोड) याने तिच्याकडून घरातील १२.५० तोळे सोने घेत फसवणूक केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी संशयित आकाश याचा शोध घेऊन त्यास अटक केली. त्याच्याकडून ६ लाख रुपयांचे साडेबारा तोळे सोने जप्त केले आहे. याप्रकरणी अंबड पोलीस तपास करीत आहेत.
पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, उपायुक्त विजय खरात, सहायक आयुक्त सोहेल शेख, अंबड पोलीस ठाण्यचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कामगिरी सहायक निरीक्षक गणेश शिंदे, सहायक निरीक्षक वसंत खतेले, उपनिरीक्षक संदीप पवार, मुकेश गांगुर्डे, संदीप भुरे, प्रवीण राठोड, तुळशीराम जाधव, किरण सोनवणे, किरण गायकवाड, हेमंत आहेर, राकेश राऊत, मच्छिंद्र वाघचौरे, जनार्दन ढाकणे, प्रशांत नागरे, मोतीराम वाघ आदींनी बजावली आहे.