नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात वेगवेगळय़ा भागात राहणा-या दोन जणांनी विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. यात एका महिलेचा समावेश आहे. दोघांच्याही आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. शहरात आत्महत्येचे सत्र सुरू असतांना या दोन घटना घडल्या. याप्रकरणी अंबड आणि नाशिकरोड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सिडकोतील सुलोचना शशिकांत शिंदे (४५ रा.साईबाबाचौक,सावतानगर) यांनी मंगळवारी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरी विषारी औषध सेवन केले होते. ही घटना निदर्शनास येताच कुटुंबियांनी त्यांना तात्काळ अशोका हॉस्पिटल मध्ये दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक बनतोडे करीत आहेत. दुसरी घटना शिंदे पळसे येथे घडली. अनिल नंदू गायधनी (४० रा.पळसे कारखाना रोड ता.जि.नाशिक) यांनी बुधवारी (दि.५) आपल्या राहत्या घरात अज्ञात कारणातून विषारी औषध सेवन केले होते. ही बाब लक्षात येताच कुटुंबियांनी तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता, उपचार सुरू असतांना डॉ.राम पाटील यांनी त्यांना मृत घोषीत केले. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक पाटील करीत आहेत.