नाशिक – चाकूचा धाक दाखवून २० लाखाची खंडणी घेऊन टोळक्याने ऑडीकारही पळवली आहे. अपहरण करुन हे कृत्य टोळक्याने केले आहे. याघटनेत खंडणीच्या वीस लाखाच्या रकमेसह अॅपलचे दोन मोबाईल व कार असा सुमारे ३० लाख ३० हजाराचा ऐवज भामट्यांनी लांबविला आहे. याप्रकरणी नरेंद्र बाळू पवार (रा.अंतरिक्ष अपा.खुटवडनगर) यांनी तक्रार दाखल केली असून सातपूर पोलीस ठाण्यात खंडणीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पवार यांच्याशी टोळक्याने बुधवारी संपर्क साधून त्यांना त्र्यंबकरोड वरील सकाळ सर्कल येथे भेटण्यास बोलावले. त्यानंतर त्यांचे अपहरण केले. यावेळी त्यांनी पवार यांची ऑडीकार एमएच ४८ एटी ७६८९ सर्कल भागात पार्क करण्यास सांगितले. त्यानंतर त्यांना इर्टीका कार मधून महामार्गाने घोटीच्या दिशेने नेण्यात आले. दरम्यान या प्रवासाच्या वाटेत त्यांना चाकूचा धाक दाखवून पैशाची मागणी केली गेली. त्यानंतर पवार यांना औरंगाबाद येथील मित्र विजय खरात यास फोन करण्यास सांगण्यात आले. त्यानंतर सिनेस्टाईल खरात यांच्याकडून वीस लाख रूपयांची रोकड औरंगाबाद येथील सिडको बस स्टँड येथे उभ्या असलेल्या एका व्यक्तीकडे सुपूर्द करण्यास भाग पाडले. ही रक्कम मिळताच अपहरणकर्त्यांनी पवार यांना सकाळ सर्कल येथे आणले. त्यानंतर या टोळक्याने ऑडीकार ताब्यात घेतली. त्यानंतर अजून पैशाची मागणी करीत कार मधून घरी सोडण्याचा बहाणा केला. त्यानंतर त्यांना घरी नेण्यात आले. पवार आपल्या घरात पैसे घेण्यासाठी कारखाली उतरले असता या टोळक्याने ऑडीकारसह पोबारा केला. याप्रकरणी अधिक तपास पीएसआय राठोड करीत आहेत.