नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– आनंदवली येथे दांडीया बघत असतांना धक्का लागल्याच्या कारणातून एकाने जावई आणि सासूवर कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेत महिलेसह तिचा जावई जखमी झाला आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी संशयितास अटक केली आहे. मनोहर रामकिसन गायकवाड (२३ रा.माळीवाडा,आनंदवली) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
याप्रकरणी चेतन दत्तू बेजेकर (२५ रा.कोळीवाडा,आनंदवली) या युवकाने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. बेजेकर आणि गायकवाड यांच्यात पूर्ववैमनस्य असून बेजेकर याचा नुकताच विवाह ठरला आहे. शनिवारी (दि.१) तो नववधूसह होणा-या सासू आणि मेव्हण्यासमवेत आनंदवली गावातील महापालिका शाळा क्र. ७१ येथे नवरात्रोत्सवानिमित्त भरविण्यात आलेल्या दांडीया गरबा पाहण्यासाठी गेला असता ही घटना घडली. रात्री दहाच्या सुमारास वधू वर पक्षातील नातेवाईक गरबा बघत असतांना संशयित गायकवाड याने बेजेकर यास गाठून धक्का लागल्याच्या कारणातून वाद घातला. यावेळी नातेवाईकांनी समजूत काढून त्यास परतवले असता संशयितांनी माघारी फिरून बेजेकर याच्यावर पाठीमागून कोयत्याने हल्ला केला. जावयाच्या मानेवर कोयत्याने वार केल्याचे लक्षात येताच होणारी सासू सविता नेताजी शिंदे (४० रा.जाधवमळा,आनंदवली) या बेजेकर याच्या मदतीला धावून आल्या असता संशयिताने शिवीगाळ करीत व तूला आता ठेवत नाही असे म्हणत त्यांच्या हातावर वार करून अंगठ्यास मोठी दुखापत केली. संशयितास पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पवार करीत आहेत.