नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- ग्रामदैवत कालिका माता यात्रेत देवदर्शन आटोपून घराकडे परणा-या महिलेची पर्स चोरट्यांनी लंपास केली. पर्समध्ये दहा हजाराच्या रोकडसह दोन मोबाईल व महत्वाचे कागदपत्र होते. या चोरीप्रकरणी सरला प्रकाश दुनबळे (६० रा.हॅपी होम कॉलनी,द्वारका) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली असून मुंबईनाका पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुनबळे या रविवारी सायंकाळच्या सुमारास मुलगा व सून यांच्यासमवेत देवदर्शनासाठी ग्रामदैवत कालिका माता मंदिर भागात गेल्या होत्या. मंदिरात मोठी गर्दी असल्याने मायलेकांसह सूनेने बाहेरूनच मुखदर्शन घेवून घराकडे परतत असतांना ही घटना घडली. कालिका मंदिर भागातील पोलिस चौकीसमोरून मायलेकांसह सून पायी जात असतांना अज्ञात चोरट्यांनी दुनबळे यांची पर्स हातोहात लांबविली. या पर्स मध्ये दहा हजाराची रोकड,दोन मोबाईल आणि बॅकेचे एटीएम कार्ड असा सुमारे ४० हजाराचा ऐवज होता. अधिक तपास जमादार शेख करीत आहेत.