नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– जुन्या वादातून दोन गटात झालेल्या तुंबळ हाणामारीत दोन जण गंभीर जखमी झाले आहे. सिडकोतील महाकाली चौकात शनिवारी रात्री घटना घडली. या मारामारी प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात दोन्ही गटातील सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यातील तीन जणांना अटक करण्यात आली आहे. सिडकोतील राजरत्ननगर भागात राहणा-या आदित्य तायडे (रा.राजरत्न गार्डन समोर) या युवकाने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, शनिवारी (दि.१) रात्री महाकाली चौकातून दांडिया खेळून मित्र मधुर उघाडे,राज शिंपी व समिर करण या मित्रांसमवेत घराकडे परतत असतांना नाल्याजवळ संशयित अजय परदेशी आणि अमोल पाटील यांनी वाट अडवित जुन्या भांडणाची कुरापत काढून शिवीगाळ केली. या घटनेत तायडे याच्यावर दुकलीने चाकू हल्ला केला असून त्यात तो जखमी झाला आहे. तर अजय परदेशी (रा. गोपाल चौक,कामटवाडे) याने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की,अमोल पाटील या मित्रासमवेत शनिवारी रात्री घराकडे जात असतांना सांडपाण्याच्या नाल्याजवळ मधुर उघाडे,राज शिंपी,आदित्य तायडे व त्यांचे अनोळखी साथीदार यांनी जुना वादातून दोघा मित्रांना शिवीगाळ व धक्काबुक्की करीत चाकू हल्ला केला. या हल्यात परदेशी जखमी झाला असून पोलिसांनी उघाडे व शिपी या संशयितांना अटक केली आहे. याप्रकरणी परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक शेख करीत आहेत.