नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महामार्ग बसस्थानक भागात किरकोळ कारणातून २१ वर्षीय तरूणावर त्रिकुटाने धारदारशस्त्राने हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेत युवक जखमी झाला आहे. हल्लेखोरांमध्ये एका पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा समावेश आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश शांताराम भोये,प्रविण जगन्नाथ शिरसाठ व एका अनोळखी तरूणाचा संशयितांमध्ये समावेश आहे. संशयितांपैकी भोये हा पोलिस रेकॉर्ड वरील गुन्हेगार आहे. याप्रकरणी ओमकार दादासाहेब लोंढे (२१ रा.विघ्नहर गणपती मंदिरामागे,डीजीपीनगर नं.१) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. लोंढे शुक्रवारी (दि.३०) कालिका यात्रेनिमित्त मुंबईनाका भागात गेला होता. मारूती मंदिराजवळील रिक्षाथांबा भागात त्याने मोबाईल रिचार्ज करण्यासाठी अनोळखी संशयितांकडे फोन पे बाबत विचारणा केली असता ही घटना घडली. संतप्त त्रिकुटाने शिवीगाळ करीत त्यास लाथाबुक्यांनी मारहाण केली. यावेळी शिरसाठ याने धमकावले तर भोये याने धारदार शस्त्राने त्याच्या डोक्यावर आणि उजव्या हाताच्या पंजावर वार केला. या घटनेत युवक जखमी झाला असून अधिक तपास जमादार आडके करीत आहेत.