नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात महिला सोनसाखळी चोरही सक्रिय झाले आहे. गेल्या काही दिवसापासून पुरुष सोनसाखळी चोरांनी धुमाकूळ घातलेला असतांना आता त्यात या महिला चोरांची भर पडली आहे. दोन घटनांमध्ये दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या भामट्या महिलेने रस्त्याने पायी जाणा-या एकीच्या गळयातील मंगळसूत्र लांबविले तर दुसरीच्या गळयातील सोन्याची पोत ओरबाडण्याचा प्रयत्न केला. या दोन्ही घटना आडगाव शिवारात घडल्या आहे. पहिल्या घटनेते राधीका नरेंद्र मनसुरे (रा.ज्ञानेश्वर सोसा.पंचकृष्ण लॉन्स शेजारी) यांनी तक्रार दाखल केली आहे. मनसुरे या शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास मुलास शिकवणीला सोडण्यासाठी जात असतांना ही घटना घडली. आडगाव चौकातून त्या पायी जात असतांना ज्युपिटर दुचाकीवर आलेल्या पुरूष आणि पाठीमागे बसलेल्या महिलेने थांबवून त्यांना पत्ता विचारला. यावेळी पुरूषाने बोलण्यात गुंतवून महिलेने त्यांच्या गळय़ातील सुमारे साडे पंधरा हजार रूपये किमतीचे मंगळसूत्र ओरबाडून नेले. तर याच दुचाकीस्वार बंटी बबलीने परिसरातील मंगला प्रकाश जंजाळकर यांच्याही गळय़ातील सोन्याची पोत हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र जंजाळकर यांनी प्रसंगावधान राखत प्रतिकार केल्याने भामट्यांनी पोबारा केला. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अधिक तपास उपनिरीक्षक सुभाष जाधव करीत आहेत.