नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – औद्योगिक वसाहतीतील संतोषी माता नगर भागात पूर्ववैमनस्यातून बापलेकांवर कोयत्याने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेत तीन जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात चार जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यातील दोघांना अटक करण्यात आली आहे. संशयितामध्ये दोन महिलांचाही समावेश आहे. सचिन जाधव व प्रविण जाधव अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे असून हेमाबाई व मोनिका जाधव यांचाही संशयितांमध्ये समावेश आहे. एकनाथ सर्जेराव घुले (५५ रा.संतोषी माता नगर,सातपूर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. घुले शुक्रवारी (दि.३०) सकाळच्या सुमारास मित्र रोहित आरणे यास सोबत घेवून दुचाकीवर कामावर जात असतांना ही घटना घडली. संतोषी माता नगर रोडवरील सुयोग रबर कंपनी समोरून दोघे मित्र प्रवास करीत असतांना सचिन व प्रविण जाधव यांनी वाट अडवित घुले यांना दुचाकीवरून लोटून दिले. यावेळी दोन्ही महिलांसह संशयितांनी त्यांना शिवीगाळ करीत लाथाबुक्यांनी मारहाण केली. या घटनेची माहिती मिळताच घुले यांचा मुलगा रोहित व अक्षय घुले यांनी घटनास्थळ गाठून वाद मिटविण्याचा प्रयत्न केला असता सचिन जाधव या संशयितांने एकनाथ व मुलगा रोहित घुले यांच्यावर कोयत्याने हल्ला केला तर दुस-या संशयिताने अक्षय घुले यास लाकडी दांडक्याने मारहाण केल्याने तिघे बापलेक जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अधिक तपास पोलिस नाईक गायकवाड करीत आहेत.