नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अलिशान वाहनांमधून बुधवारी वेगवेगळया भागात घडलेल्या घटनांमध्ये दोन कारमधून सुमारे अडीच लाखाची रोकड चोरट्यांनी लंपास केली. त्यातील एका कारची काच फोडून तर वाहन पंक्चर झालेल्या कारच्या सिटावर ठेवलेली हॅण्ड बॅग चोरट्यांनी पळवली. याप्रकरणी पंचवटी आणि मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिली घटना द्वारका परिसरात घडली. टाकळीरोड भागात राहणारे मुर्तझा मोहम्मद अली बगसरावाला (रा.जेजूरकर लेन) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. बगसरावाला हे गुरूवारी (दि.२९) व्यावसायीक वसूली करून रात्री घराकडे परतत असतांना ही घटना घडली. द्वारका परिसरातील मयुर प्लाझा येथे क्रेटा (एमएच १५ एफई ००५३) कार पंक्चर झाल्याने त्यांनी निरंजन गॅरेज येथे आपले वाहन उभे केले असता ही घटना घडली. वाहनातून उतरून ते पाठीमागील चाकाची पाहणी करीत असतांना अज्ञात चोरट्याने पुढील आसनावर ठेवलेली हॅण्ड बॅग चोरून नेली. या बॅगेत ७१ हजाराची रोकड व दोन मोबाईल असा सुमारे ९६ हजाराचा ऐवज होता. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक संदिप पाटील करीत आहेत. तर दुसरी घटना पंटवटी भागात घडली. नाशिकरोड येथील जयभवानी मार्ग भागात राहणारे परिक्षीत रशिकांत निकम (रा.पाटोळे मळा,जयभवानी रोड) हे बुधवारी (दि.२८) दुपारच्या सुमारास कामानिमित्त पंचवटी भागात आले होते. पंचवटी पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या महालक्ष्मी थिएटर जवळ ते कामासाठी गेले असता म्हसोबा मंदिर बाजूच्या डिव्हायडर जवळ पार्क केलेल्या त्यांच्या क्रेटा कारची (एमएच १५ एचएफ ६२०४) खिडकीची काच फोडून सिटावर ठेवलेली बॅग चोरून नेली. या बॅगेत दीड लाखाची रोकड व महत्वाची कागदपत्र होते. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार कुलकर्णी करीत आहेत.