नाशिक (इंडिया दर्पण वृत्तेसवा) – जिल्हा व सत्र न्यायालयातील बनावट जामिनदारांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मृत व्यक्तीचे कागदपत्र सादर करून अनोळखी इसमाच्या माध्यमातून एकाने विनयभंगाच्या गुन्ह्यात जामिन मिळविल्याचा प्रकार उघड झाला आहे. मयूर राजेंद्र हिरावत (२५ रा.हिरावत चाळ,सुदर्शन कॉलनी दत्तनगर,पेठरोड) व अनोळखी इसम अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. सरकारवाडा पोलिस ठाण्यात फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
न्यायालयाची दिशाभूल केल्यामुळे या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली आहे. पोलिसांनी संशयितासह जामिनासाठी उभ्या राहणा-या अनोळखी इसमाविरूध्द त्यामुळे कारवाई केली आहे. याप्रकरणी दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे सहाय्यक अधिक्षक रंजना साळवे यांनी तक्रार दाखल केली आहे. पंचवटी पोलिस ठाण्यात संशयित मयूर हिरावत याच्याविरूध्द विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल आहे. या गुह्यात संशयिताने १५ डिसेंबर २०२० ते २९ सप्टेंबर २०२२ दरम्यान न्यायालयाची दिशाभूल करून जामिन मिळविला होता. गंगापूर गावातील गणपत भिका जाधव हे २ डिसेंबर २०१४ मध्ये मृत झालेले असतांना संशयितांनी १५ डिसेंबर २०२० रोजी मृत जाधव यांचे नावे असलेला बनावट सात बारा उतारा आणि आधार कार्ड सादर करून स्व:ताचा जामिन मिळविला. यासाठी एका अनोळखी इसमास न्यायालयासमोर उभे करून मृत जाधव असल्याचे भासविण्यात आले होते. कागदपत्र तपासणीत ही बाब उघड झाल्याने न्यायालयीन अधिक्षकांनी पोलिसात धाव घेतली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पाटील करीत आहेत. दरम्यान यापूर्वीही जिल्हा व सत्र न्यायालयातील बनावट जामिन प्रकरणे चर्चेत आली होती.