नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– आडगावनाका भागात गॅस भरण्याच्या बहाण्याने रिक्षातून आलेल्या टोळक्याने पंपचालकास मारहाण करीत करुन ७ हजार ५५० रूपयांची रोकड लंपास केली. या घटनेनंतर पोलिसांनी सीसीटिव्ही यंत्रणेच्या आधारे चार जणांच्या टोळक्यास तातडीने पकडून गजाआड केले आहे. संदेश उर्फ काळू सुधाकर पगारे (२१ रा.भेंडीचाळ,राहूलवाडी पेठरोड), दगडू उर्फ विक्की लक्ष्मण जोजे (२१ रा.अमरधामजवळ,पंचवटी),विक्की नरेश शिंदे (२२ रा.नागझरी शाळे जवळ,नानावली,जुने नाशिक) व निलेश श्रीपत उफाडे (१९ रा.मायको हॉस्पिटलमागे,कालीकानगर) अशी संशयितांची नावे आहेत. या लुटमारीची व मारहाणाची तक्रार सचिन संजय सातभाई (रा.गितेमळा,मुंबईनाका) यांनी दिली असून पंचवटी पोलिस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातभाई आडगाव नाका येथील ओमनगर भागात असलेल्या गोगॅस पंपाचे काम बघतात. रविवारी ते नेहमी प्रमाणे गॅस पंपावर सेवा बजावत असतांना एमएच १५ झेड ९६७७ मधून आलेल्या टोळक्याने ही लुटमार केली. गॅस भरण्याच्या बहाण्याने आलेल्या टोळक्याने सातभाई यांना चाकूचा धाक दाखवत लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेत टोळक्याने वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी देत त्यांच्या खिशातील ७ हजार ५५० रूपयांची रोकड बळजबरीने काढून घेत पोबारा केला. या घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे टोळक्याच्या मुसक्या आवळल्या असून अधिक तपास उपनिरीक्षक माळी करीत आहेत.