नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– भरदिवसा चोरट्यांनी धाडसी घरफोडी करीत सुमारे ७५ हजाराचा ऐवज चोरून नेल्याची घटना व्दारका परिसरातील गणेशनगर येथे घडली. या घरफोडी प्रकरणी ज्योती रमेश पेंढारे (रा.चंद्रभागा कॉम्प्लेक्स,गणेशनगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. या घरफोडीत सोन्याचांदीचे दागिणे, रोकड व सुतार कामाचे साहित्याचा समावेश आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पेंढारे कुटुंबिय शनिवारी कामासाठी घराबाहेर पडले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून कपाटात ठेवलेली ८ हजाराची रोकड,सोन्याचांदीचे दागिणे आणि सुतार कामाचे साहित्य असा सुमारे ७५ हजार रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास उपनिरीक्षक पवार करीत आहेत.