नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- कैद्यांकडून पैश्यांची मागणी करुन त्यांना पॅरोल मंजूर करण्यासह रेकॅार्डवरील शिक्षा कमी करणा-या नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील दोन तुरुंगाधिकाऱ्यांची न्यायालयीन कोठडीत रवाणगी करण्यात आली आहे. नाशिकरोड पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशाने आरोपी श्यामराव अश्रुबा गीते, माधव कामाजी खैरगे यांना अटक केली. हे दोघेही अटकपूर्व जामिन मिळवण्यासाठी उच्च न्यायालयात गेले होते. मात्र, न्यायालयाने जामीन नाकारल्याने दोघेही नाशिकच्या नाशिक रोड न्यायालयाला शरण आले होते. त्यानंतर येथील न्यायालयाने त्यांना शिक्षा सुनावत दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. तसेच या गुन्ह्यातील तिसऱ्या संशयित लिपिक सुरेश जयराम डबेराव अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.
या प्रकरणात एप्रिल २०२२ मध्ये तुरुंगाधिकारी सतीष गायकवाड यांच्या फिर्यादीनुसार नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. शिक्षा भोगणा-या कैदी व त्यांच्या नातलगांकडून लाच घेऊन कैद्यांच्या शिक्षा कमी करुन त्यांना तात्पुरत्या स्वरुपात कागदोपत्री खाडाखोड करुन मुक्त किंवा शिक्षा कमी केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. २०१७ मध्ये नाशिकरोड कारागृहात कार्यरत तुरुंगाधिकारी संशयित श्यामराव अश्रुबा गीते, माधव कामाजी खैरगे आणि वरिष्ठ लिपिक सुरेश जयराम डबेराव यांनी कैद्यांना शिक्षेचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच लाच घेऊन कारागृहातून बेकायदेशीरपणे सोडले होते. ही बाब कारागृह प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर कारागृह महासंचालकांनी अंतर्गत चौकशी करण्याचे आदेश दिले होते, या चौकशीत हे आरोपी दोषी असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.