नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महामार्गावरील सर्व्हीसरोडवर भरधाव अॅटोरिक्षाने धडक दिल्यामुळे सायकलस्वार ठार झाल्याची घटना घडली आहे. अभय सुरेंद्र शर्मा (३८ मुळ रा.बिहार हल्ली दिव्य अभिलाषा हॉटेल,भुजबळ फॉर्म) असे मृत सायकलस्वाराचे नाव आहे. या अपघातानंतर रिक्षाचालक पसार झाला. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात अज्ञात रिक्षाचालकाविरोधात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. शर्मा बुधवारी सकाळच्या सुमारास गोविंदनगरकडून गडकरी सिग्नलच्या दिशेने सायकलवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. सर्व्हीसरोडने ते सायकलवर जात असतांना मुंबईनाका कॉर्नर वरील मारूती मंदिरासमोर पाठीमागून भरधाव आलेल्या अज्ञात अॅटोरिक्षाने सायकलीस धडक दिली. या अपघातात शर्मा गंभीर जखमी झाले होते. नजीकच्या सुविधा हॉस्पिटल येथे त्यांना दाखल केले असता उपचारा दरम्यान गुरूवारी त्यांचा मृत्यू झाला. याबाबत संतोषकुमार चंद्रवंशी यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात रिक्षाचालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक मन्सुरी करीत आहेत.