नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -दिंडोररोडवरील एका दारू दुकानासमोर जुन्या वादातून धारदार शस्त्राचा धाक दाखविणा-या रिक्षाचालकाच्या हातातील कोयता हिसकावून घेत टोळक्याने तीन जणांवर हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेत रिक्षाचालकासह दोन प्रवासी जखमी झाले आहे. याप्रकरणी याप्रकरणी शुभम प्रकाश पैठणे (रा.म्हसरूळ) या तरूणाने तक्रार दाखल केली असून पंचवटी पोलिस ठाण्यात तिन जणाच्या टोळक्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजू भावसार,संजू भावसार व मनोज भावसार अशी रिक्षाचालकाचा कोयता हिसकावून घेत प्रतिहल्ला करणा-या संशयितांची नावे आहेत. अतुल सैय्यद आणि छोटू उर्फ जयशंकर सिंग हे दोघे मित्र मंगळवारी सायंकाळच्या सुमारास रिंकेश सोलंकी या चालकाच्या रिक्षातून दिंडोरी वाईन्स या दुकानात दारू खरेदीसाठी गेले असता ही घटना घडली. वाईन्स शॉप जवळील भावसार यांचे दुकानासमोरून रिक्षा जात असतांना चालक सोलंकी याने आपले वाहन थांबवून संशयित राजू भावसार यास जुन्या वादातून कोयता दाखविला. यातून दोघांमध्ये वाद होवून झटापटीत संशयित भावसार याने सोलंकी याच्या हातातील कोयता हिसकावून घेत त्याच्या डोक्यात वार केला. यावेळी रिक्षातील प्रवास्यांकडे मोर्चा वळवित संतप्त भावसार याने सैय्यद यांच्या मानेवर वार केला. यावेळी सैय्यद याने बचावाचा प्रयत्न केला असता संजू भावसार याने जमिनीवर पडलेला चॉपरने त्याच्यावर सपासप वार केले. यावेळी तक्रारदार यांनी वाद मिटविण्याचा प्रयत्न केला असता मनोज भावसार याने त्यांना लाकडी दांडक्याने मारून जखमी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक घडवजे करीत आहेत.