नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र प्रकरणात जिल्हा रूग्णालयातील दोन्ही वैद्यकीय अधिका-यांचा अटकपूर्व जामिन अर्ज मंगळवारी जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाल्यानंतर हे दोघेही अधिकारी फरार झाल्याची चर्चा आहे. डॉ. निखील सैंदाणे आणि डॉ. किशोर श्रीवास अशी अटकपूर्व अर्ज फेटाळण्यात आलेल्या अधिका-यांची नावे आहे. या दोघा अधिका-यांवर अटकेची टांगती तलवार असल्यामुळे ते नॅाट रिचेबल झाले आहे.
खोटे वैद्यकीय अहवाल सादर केल्याचा प्रकरणात सिव्हिलमधील रॅकेट उघड झाल्यानंतर पोलिसांनी आता तपासाला वेग दिला आहे. याप्रकरणी अधीक्षक कार्यालयातील लिपिक हिरा कनोज आणि रूग्णालयातील लिफ्टमन कांतिलाल गांगुर्डे यांना अटक करण्यात आली. हे दोघेही न्यायालयीन कोठडीत आहे. या दरम्यान, तत्कालीन अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉ. किशोर श्रीवास आणि प्रशासकीय अधिकारी डॉ. निखील सैंदाणे यांनी अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात धाव घेतली. पण, पोलिसांनी दोन्ही डॉक्टरांना यापूर्वी जबाबासाठी बोलावूनही त्यांनी टाळल्याचे सांगितल्यानंतर न्यायालयाने दोघांचेही अर्ज फेटाळले आहेत. आता या दोन्ही अधिका-यांचा पोलिस शोध घेत असून, त्यांना लवकरच अटक होण्याची शक्यता आहे.