तिस-या माळय़ावरील बाल्कनीतून पडल्याने ७२ वर्षीय वृध्देचा मृत्यू
नाशिक : सातपूरच्या खांदवेनगर भागात तिस-या माळय़ावरील बाल्कनीतून पडल्याने ७२ वर्षीय वृध्देचा मृत्यू झाला. मंगला दत्तात्रेय दळवी (४१ रा.स्वागत सिंपनी,खांदवेनगर) असे मृत वृध्देचे नाव आहे. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दळवी या मंगळवारी सायंकाळच्या सुमारास इमारतीच्या तिस-या माळय़ावरील आपल्या घराच्या बाल्कनीत उभ्या असतांना ही घटना घडली. अचानक तोल गेल्याने त्या जमिनीवर कोसळल्या होत्या. या घटनेत त्यांच्या डोक्यास व हातापायास गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत भाचा चिन्मय दळवी यांनी खबर दिल्याने पोलिस दप्तरी मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार बेंडकुळे करीत आहेत.
…..
गळफास लावून युवकाची आत्महत्या
नाशिक : २९ वर्षीय युवकाने आपल्या राहत्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना अमृतधाम परिसरातील बिडी कामगार नगर वसाहतीत घडली. शशिकांत राजेंद्र मोरे (रा. डॉ.आंबेडकर चौक,बिडी कामगारनगर) असे मृत युवकाचे नाव आहे. मोरे यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मोरे याने मंगळवारी (दि.२०) अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये छताच्या अँगलला साडी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्याचा मृत्यू झाला. ही घटना सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. याबाबत राजेंद्र जाधव यांनी दिलेल्या खबरीवरून मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार लोहकरे करीत आहेत.