कट मारल्याच्या कारणातून दुचाकीस्वाराने कंटेनर चालकास केली बेदम मारहाण
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- अंबड लिंकरोडवरील एक्स्लो पॉईंट भागात कट मारल्याच्या कारणातून दुचाकीस्वाराने कंटेनर चालकास बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेत दगड फेकून मारण्यात आल्याने चालक जखमी झाला आहे. या मारहाणीची तक्रार रामसवारे रामरथ कनोजिया (रा.सिल्वासा रोड लाईन्स ट्रान्सपोर्ट,अंबड लिंकरोड) या चालकाने केली आहे. या तक्रारीवरुन अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कनोजिया रविवारी सायंकाळच्या सुमारास आपल्या ताब्यातील कंटेनर जीजे १५ एटी ४९२५ ओझर येथून गरवारे मार्गे अंबड लिंकरोडवरील एक्स्लो पॉईंड च्या दिशेने घेवून जात असतांना ही घटना घडली. एक्स्लो पॉईट भागात एमएच १५ इआर ७०२५ या दुचाकीवर आलेल्या एकाने शिवीगाळ करीत कंटेनर थांबवून मला कट का मारला असा जाब विचारत कनोजिया यांना लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेत कनोजिया यांनी बचावासाठी वाहन सोडून पळ काढण्याचा प्रयल केला असता संशयिताने दगड फेकून मारला. डोक्यास दगड लागल्याने कनोजीया जखमी झाले असून अधिक तपास हवालदार राऊत करीत आहेत.
सिडकोतील बडदे नगर भागात आत्महत्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सिडकोतील बडदे नगर भागात राहणा-या ५५ वर्षीय इसमाने गळफास लावून घेत आत्महत्या केली. रमेश हिरालाल विसपुते (रा.शायना पार्क,भामरे मिसळ जवळ,मंगलमुर्ती नगर) असे आत्महत्या करणा-या व्यक्तीचे नाव आहे. विसपुते यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
विसपुते यांनी सोमवारी सायंकाळच्या सुमारास अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील छताच्या हुकास ओढणी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला. याबाबत तुषार वडनेरे यांनी दिलेल्या खबरीवरून अंबड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार शेख करीत आहेत.