नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गाडगे महाराज पुलाखाली अॅटोरिक्षा नंबरवरून एका चालकास त्रिकुटाने बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेत लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आल्याने चालक जखमी झाला असून याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात हाणामारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोपाळ सोनवणे व त्याचे दोन साथीदार असे मारहाण करणा-या टोळक्याचे नाव आहे. याप्रकरणी विकी साहेबराव बोधक (२५ रा.निकमवाडा,नागचौक) या जखमी रिक्षाचालकाने तक्रार दाखल केली आहे. बोधक आणि संशयित रिक्षाचालक असून त्यांच्यात नंबरवरून वाद झाल्याने ही हाणामारी झाली. बोधक शुक्रवारी (दि.१६) सायंकाळच्या सुमारास गाडगेमहाराज पुलाखालील मरीमाता मंदिरासमोरील रिक्षा थांब्यावर आपली अॅटोरिक्षा पार्क करून प्रवाश्यांची प्रतिक्षा करीत असतांना ही घटना घडली. सोनवणे याने बोधक यास गाठून माझा पहिला नंबर असून तू पाठीमागे रिक्षा लाव या कारणातून वाद घातला. यावेळी बोधक यांनी समजून सांगण्याचा प्रयत्न केला असता संशयितासह त्याच्या दोन साथीदारांनी शिवीगाळ करीत त्यांना लाथाबुक्यांनी आणि लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. या घटनेत बोधक जखमी झाले असून अधिक तपास पोलिस नाईक वाडेकर करीत आहेत.









