नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मिठाईत झुरळ टाकून दुकानदाराकडून खंडणी वसूल व धमकी देणा-याविरुध्द सरकारवाडा व गंगापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या खंडणीबहाद्दाराने मिठाईत झुरळ असल्याचा व्हिडिओ बनवून एका मिठाई दुकानदारांकडून एक लाख उकळले. तर दुस-या दुकानादाराला धमकी देऊन ५० हजार रुपयाची मागणी केल्याचे समोर आले आहे. अजय राजे ठाकूर असे संशयिताचे नाव आहे.
या खंडणीबहादाराने १९ ऑगस्ट व ७ सप्टेंबर या तारखांना विद्याविकास सर्कलजवळील स्वीट्स व सावरकरनगर येथील मधुर स्वीट्स या दुकानात मिठाई खरेदी केली. यावेळेसच त्याने व्हिडिओ बनवून खंडणीची मागणी केली. पहिल्या घटनेत सागर स्वीटस या दुकानातून या खंडणीबहाद्दराने बासुंदी खरेदी केली. त्यानंतर त्यामध्ये झुरळ टाकून त्याचा व्हिडिओ बनवून दुकानमालक रतन पुंजाजी चौधरी (४०,रा.लवाटेनगर) यांना अन्न-औषध प्रशासनाकडे तक्रार करण्याचा धाक दाखवला. त्यानंतर दुकानाच्या पाठीमागील कार्यालयात २० ऑगस्ट रोजी १ लाख रुपयांची रोकड खंडणीच्या स्वरुपात घेतली. या सर्व प्रकाराची तक्रार दुकानमालक रतन चौधरी यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात दिली. या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुस-या घटनेत सावरकरनगर येथील मधुर स्वीटस येथे रबडी खरेदी करुन झुरळ टाकून व्यवस्थापक पुखराज चौधरी यांच्याकडे ५० हजाराची खंडणी मागीतली. या धमकीची फिर्याद दुकानमालक मनीष मेघराज चौधरी (२३,रा.पाईपलाईनरोड) यांनी गंगापुर पोलिस स्थानकात केली आहे. या तक्रारीवरुन पोलिसांनी अजय ठाकुर विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. या ठिकाणीही व्हिडिओ काढून अन्न – औषध प्रशासनाकडे तक्रार करण्याचा धाक दाखवला.