नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीतून घरी परतत असतांना युवकावर दहिपुलच्या हुंडीवाला लेन ज्ञानेश्वर मंदिराजवळील चौकात धारधार शस्त्राने प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली आहे. वैभव शरद कातकाडे (वय २४, रा. दहिपुल, रामचंद्र संकुल, नाशिक ) असे छातीवर वार झालेल्या तरुणाचे नाव आहे. शुक्रवारी रात्री १० वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. हल्ला झालेल्या वैभवला तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याला खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. मिरवणुकीतून घरी परतत असतांना चौकात सुरु असलेल्या मित्रांचे भांडण सोडवण्यासाठी तो गेला होता. यावेळेस अज्ञात इसमांनी छातीवर धारधार शस्त्राने वार करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.
वैभव हा शुक्रवारी रात्री ७ वाजेच्या सुमारास नाशिकमध्ये सुरु असलेली गणेश विसर्जन मिरवणूक बघण्यासाठी गेला होता. त्यानंतर १० वाजेच्या सुमारास वैभव हा घराकडे परतत असतांना, घराजवळील चौकात हुंडीवाला लेन ज्ञानेश्वर मंदिराजवळ काही टोळक्यांचे भांडण सुरु होते. त्यात वैभवच्या ओळखीचे होते. वैभव ते भांडण सोडविण्यासाठी गेला असता त्या टोळक्यातील काही अज्ञात तरुणांनी वैभवच्या छातीवर वार करत पसार झाले. यात वैभव गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. भद्रकाली पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
मनपा शाळा परिसर टवाळखोराचा अड्डा
हुंडीवाला लेन परिसरातील गणपती मंदिरा शेजारी मनापाची शाळा आहे. सध्यस्थीतीत शाळेचा हा परिसर टोळक्याचा अड्डा बनला आहे. रात्रीच्या वेळी दारू पिणे, सिगारेट, गांजा ओढणे आदी प्रकार नित्याचेच बनले आहे. परिसरातील नागरिकांनी हटकवले असता हे टवाळखोर नागरिकांना शिवीगाळ करत धमाकावत असल्याचे येथील स्थानिक नागरिक सांगतात.
सिसिटीव्ही फुटेज ठरणार महत्वपूर्ण
हुंडीवाला लेन परिसरातील बहुतांश दुकानदारांकडे सिसिटीव्ही कॅमेरे बसविलेले आहे. या फुटेजच्या आधारे आरोपी लवकरच पोलिसांच्या हाती लागणार असून आता हेच फुटेज गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यास महत्वपूर्ण ठरणार आहे.