नाशिक : नाशिक तालुक्यातील वंजारवाडी येथे घराची भिंत अंगावर कोसळून शेतमजूर दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. सुदैवाने यात चार भावंडे पलंगावर झोपलेली असल्याने बालंबाल बचावले आहेत. छबू सिताराम गवारी (३८) व मंदा छबू गवारी (३५ रा.कोळीवाडा,वंजारवाडी) असे मृत दांम्पत्याचे नाव आहे. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गवारी दांम्पत शेतमजूरी करून उदनिर्वाह करतात. त्याना तीन मुली आणि एक मुलगा अशी आपत्य असून शुक्रवारी रात्री हे कुटूंब झोपी गेले असता ही दुर्घटना घडली. गेल्या दोन तीन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे गवारी यांच्या मातीने बांधलेल्या घराची भिंत भिजली होती. नेहमी प्रमाणे गवारे दांम्पत्य ओसरीत तर मुले खोलीतील पलंगावर झोपलेले असतांना पहाटेच्या सुमारास ओसरीची भिंत कोसळली. यात साखर झोपेत असलेले गवारी दांम्पत्य मातीच्या ढिगा-याखाली दबले गेले होते. अचानक मोठा आवाज झाल्याने शेजा-यांनी वेळीच धाव घेतल्याने ही घटना निदर्शनास आली. पलंगावरील मुले सुरक्षीत असतांना त्यांचे आई वडिल दिसून न आल्याने ग्रामस्थांनी मदत कार्य हाती घेत मातीचा ढिगा-यात शोध घेतला असता छबू गवारी आणि मंदा गवारी हे पती पत्नी मृत अवस्थेत मिळून आले. अधिक तपास पोलिस नाईक भोईर करीत आहेत.