नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तीन घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी सुमारे साडे चार लाख रूपयाचा ऐवज लंपास केला आहे. शहरातील वेगवेगळ्या भागात झालेल्या या घरफोडीमध्ये सोन्याचांदीचे दागिणे, रोकड आणि दुकान फोडीतील हार्डवेअर साहित्य चोरट्यांनी चोरुन नेले. याप्रकरणी मुंबईनाका, इंदिरानगर व अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पहिली घटना सिडकोत घडली. रोहित अशोक भामरे (रा.हेडगेवार नगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. भामरे कुटुंबिय मंगळवारी (दि.६) आपल्या गावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून कपाटात ठेवलेले सुमारे ४३ हजार रूपये किमतीचे सोन्याचांदीचे दागिणे चोरून नेले. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक पावरा करीत आहेत. दुसरी घटना महामार्गावरील हरिओम ढाबा परिसरात घडली. समकित सुरेश राका (रा.गोविंदनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. राका यांचे कमोद शॉपिंग कॉम्प्लेंक्स मध्ये गजेंद्र सेल्स कॉर्पोरेशन नावाचे प्लंबिग आणि हार्डवेअर नावाचे दुकान आहे. अज्ञात चोरट्यांनी बुधवारी (दि.७) रात्री अज्ञात चोरट्यांनी दुकान फोडून गल्यातील साडे सात हजाराची रोकड व पॅरीवेअर,जॅग्वार,हिंडवेअर कंपनीचे नळ,बॉलवॉल,डिव्हीआर सेट असा सुमारे २ लाख ४३ हजार रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक बारेला करीत आहेत. तिसरी घटना वडाळानाका भागात घडली. आशा राम आल्हाटे (रा.कांचन कार डेकोर शेजारी,नागसेननगर) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आल्हाटे कुटुंबिय बुधवारी (दि.७) बाहेरगावी गेले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून लोखंडी कपाटातील १ लाख ७० हजाराची रोकड आणि सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे १ लाख ९१ हजार रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक गेंगजे करीत आहेत.