नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- टाकळीरोड भागात रस्त्याने पायी जाणा-या वृध्देच्या गळयातील लाखाची पोत दुचाकीस्वारांनी लंपास केल्याची घटना घडली. या चोरीप्रकरणी विनीता विलास भिंगे (६४ रा.जुनी पंडित कॉलनी,गंगापूररोड) यांनी तक्रार दाखल केली असून भद्रकाली पोलिस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भिंगे या रविवारी द्वारका परिसरातील टाकळीरोड भागात गेल्या होत्या. सायंकाळच्या वेळी त्या घराकडे परतत असतांना ही घटना घडली. घोडेश्वार बाबा दर्गा जवळून त्या पायी जात असतांना दुचाकीवर आलेल्या दोघा भामट्यांपैकी एकाने त्यांच्या गळयातील सुमारे ९० हजार रूपये किमतीची व तीन तोळे वजनाची सोन्याची पोत हिसकावून तिगरानीया रोडने मारूती वेफर्सच्या दिशेने पोबारा केला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक मोहिते करीत आहेत.