अल्पवयीन मित्राच्या मृत्यूप्रकरणी तरूणाविरूध्द गुन्हा दाखल
नाशिक – अल्पवयीन मित्राच्या मृत्यूप्रकरणी तरूणाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरधाव दुचाकी घसरल्याने हा अपघात झाला होता. या अपघातात युवकही जखमी झाला होता. मृत मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून याप्रकरणी आडगाव पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. आकाश मोतीराम आंबेकर (२१ रा.निलगीरीबाग) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. ऋषिकेश अनिल गरड (१७ रा.स्वराजनगर,नांदूरगाव) या अल्पवयीन मुलाचा गेल्या रविवारी रात्री दुचाकी घसरल्याने अपघातात मृत्यू झाला. आंबेकर आणि गरड हे दोघे मित्र रविवारी रात्री दुचाकीने शिवनगर भागातील डाळींब मार्केट येथे गेले होते. एमएच १५ एचएस २३४९ या दुचाकीने दोघे शिवनगर येथून सिध्दीविनायक चौकातून बळीमंदिराच्या दिशेने प्रवास करीत असतांना हा अपघात झाला होता. डाळींब मार्केट भागात चालकाचा आपल्या वाहनावरील ताबा सुटल्याने दोघे जखमी झाले होते. त्यातील गरड याचा मृत्यू झाला. तर चालक आंबेकरही या अपघातात जखमी झाला असून गरडच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून त्याच्याविरूध्द अपघाताची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास हवालदार गायकवाड करीत आहेत.
पाय घसरून पडल्याने ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
नाशिक : सिडकोतील शिवाजीचौकात राहत्या घरात पाय घसरून पडल्याने ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. लक्ष्मण केरबा पारवे (रा.मरीमाता मंदिराजवळ) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पारवे गेल्या रविवारी पहाटेच्या सुमारास आपल्या राहत्या घरातील जिन्यावरून अचानक पाय घसरून पडले होते. या घटनेत त्यांच्या डोक्यास वर्मी मार लागला होता. कुटूंबियांनी त्यांना तात्काळ आडगाव येथील मेडिकल कॉलेज येथे दाखल केले असता आठ दिवसांच्या उपचारानंतर रविवारी त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास हवालदार शेख करीत आहेत.