नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– पखाल रोड भागात भोंदू महिलेने दोन महिलेची फसवणूक करत सव्वा लाख रूपये किमतीचे दागिने लंपास केल्याची घटना घडली. मातीच्या दोन वाटीत पूजा करून बंद केलेले दागिणे कपाटात ठेवून देण्याचा सल्ला देत या महिलेने हे दागिने लांबविले. रीहाना असे संशयित भोंदू महिलेचे नाव आहे. या फसवणूक प्रकरणी अफारोज शेख (रा.साहिल पार्क पखाल रोड) यांनी तक्रार दाखल केली असून मुंबईनाका पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार अफरोज शेख आणि शगुफता शेख या दोन महिलांना गाठून भामटीने हा गंडा घातला आहे. जुलै महिन्यात रीहाना नामक महिलेने कुटुंबियांच्या आरोग्यदायी आणि सुख समृध्दीसाठी विधीवत पूजा केल्यास मोठा फायदा होत असल्याची बतावणी केली होती. वेळोवेळी भेट देत दोघा महिलांना तिने विश्वासात घेतले. सोन्याच्या दागिण्यांवरच ही पूजा केली जात असल्याचे सांगून त्यांना पूजा करण्यास भाग पाडले. शगुफता शेख या महिलेच्या घरात सोमवारी (दि.२९) ही पूजा पार पडली. यावेळी दोन्ही महिलांच्या दागिण्यांची भामटीने विधीवत पूजा केली. व दागिणे मातीच्या प्रत्येकी दोन वाटीमध्ये वेगवेगळे बंद केले. सदरचे दागिणे कपाटात ठेवून दुस-या दिवशी वाटी उघडण्याचा सल्ला दिल्याने दोघा महिलांनी आपआपल्या घरातील कपाटात ठेवलेले दागिणे उघडून बघीतले असता ते मिळून आले नाही. नजर चुकवून भामट्या महिलेने पूजाविधीच्या नावाने तीन तोळे वजनाचे व सुमारे १ लाख १८ हजार रूपये किमतीचे अलंकार हातोहात लांबविल्याचा प्रकार लक्षात येताच दोघा महिलांनी पोलिसात धाव घेतली असून अधिक तपास उपनिरीक्षक सोनवणे करीत आहेत.