नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंचवटीतील तुळजा भवानी पेट्रोल पंप भागात व्यावसायीक स्पर्धेतून दोघा भावांना हॉकी स्टीकने बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. या मारहाणीची लौकिक केदा पगार (रा.अनुसयानगर,पवारमळा म.बादरोड) यांनी तक्रार दाखल केली असून पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अविनाश दिलीप शिंदे आणि रविंद्र दिलीप शिंदे (रा.दोघे वडजाईमाता नगर,मखमलाबाद रोड) अशी दोघा भावांना मारहाण करणा-या संशयितांची नावे आहेत. संशयित शिंदे आणि पगारे बंधूचा एकमेकांना लागून सलून व्यवसाय असून त्यातून हा वाद झाला. लौकिक पगारे आणि राहूल पगारे हे दोघे भाऊ गेल्या शनिवारी (दि.२७) रात्री दुकान वाढवून घराकडे निघाले असता ही घटना घडली. शिंदे बंधूनी तुळजाभवानी पेट्रोल पंपाजवळील विजय गॅलेक्सी सोसायटी समोर दोघा भावांना गाठून तुम्ही दुकान टाकल्याने आमचा धंदा होत नाही. तुमचा व्यवसाय बंद करून गावी निघून जा असे म्हणून दोघा भावांना शिवीगाळ व लाथाबुक्यांनी मारहाण केली. यावेळी संतप्त शिंदे बंधूनी लाकडी दांडा आणि हॉकी स्टिकने मारहाण केल्याने ते जखमी झाले असून अधिक तपास उपनिरीक्षक बागुल करीत आहेत.