नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) खडकाळी सिग्नलजवळ भरधाव दोन मोटारसायकलीमध्ये झालेल्या अपघातात बुलेटस्वार ठार झाला. विक्रांत हेमंत खांदवे (रा.खांदवे वाडा,सोमवारपेठ भद्रकाली) असे अपघातात ठार झालेल्या बुलेटस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात पसार झालेल्या अन्य दुचाकीस्वाराविरूध्द अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खांदवे शनिवारी औषधे खरेदीसाठी मेनरोड भागातील मेडिकल स्टोअर्सच्या दिशेने एमएच १५ जीजे ००३४ या बुलेटवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. खडकाळी सिग्नलकडून दुधबाजारच्या दिशेने ते प्रवास करीत असतांना सिग्नल भागातच दोन दुचाकींमध्ये अपघात झाला. या अपघातात खांदवे यांना जखमी अवस्थेत सोडून अन्य दुचाकीस्वार आपल्या वाहनासह पसार झाला. खांदवे यांना कुटूंबियांनी तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. भाऊ हरिश खांदवे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पसार झालेल्या दुचाकीस्वाराविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक माळी करीत आहेत.